५ नोव्हेंबर १८१७ - खडकीची लढाई !
५ नोव्हेंबर १८१७ - खडकीची लढाई !
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा साम्राज्याच्या अंताची सुरुवात ज्या लढाईत झाली ती लढाई म्हणजे खडकीची लढाई होय. दि .५ नोव्हेंबर २०१८ रोजी या लढाईला २०१ वर्षे पूर्ण होतील. ही लढाई पुण्याजवळ खडकी येथे पेशवे बाजीराव रघुनाथ भट आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये झाली. वस्तूतः १७६१ साली पानिपतावर जसे तुमुल युद्ध होऊन जशी दोन्ही पक्षांची प्रचंड प्राणहानी झाली त्या मानाने या खडकीच्या लढाईत झालेली प्राणहानी अतिशय नगण्य म्हणावी लागेल. पण तिकडे पानिपतावर झालेल्या प्रचंड हानी नंतर सुद्धा मराठा साम्राज्य नेटाने उभे राहते आणि इकडे मात्र खडकी (आणि मग येरवडा , कोरेगाव भीमा आणि शेवटी आष्टी येथे) मराठ्यांचा निर्णायक लष्करी पराभव न होताच मराठे शाही कशी बुडते हे वरकरणी समजून घेण्यास अवघड वाटते. यासाठी आपल्याला १८१७च्या आधी काही दशके मागे इतिहासात डोकवावे लागेल.
मराठे इंग्रज संबंध :-
मराठे इंग्रज संबंध हे कायमच किचकट आणि गुंतागुंतीचे राहिले आहेत. (इथे इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यांचे अधिकारी असा अर्थ अभिप्रेत आहे ). खुद्द छ. शिवाजीराजांच्या काळात मराठ्यांचा इंग्रजांशी प्रथम प्रत्यक्ष झगडा हा सुरत स्वारीच्या वेळी झाला असे म्हणता येईल. अर्थात त्याआधीही इंग्रजांनी मराठ्यांच्या कुरापती काढल्याचं होत्या. १६७९ मध्ये खांदेरीच्या प्रकरणात तर मराठे आणि इंग्रज यांच्यात आरमारी युद्धच पेटले होते जे मराठ्यांनी जिंकले. संभाजी राजांच्या काळात एलिफंटा बेटाच्या तटबंदीच्या संबंधाने इंग्रजांशी त्यांची कुरबुर झाली पण ती तिथेच थांबली. छ. राजाराम यांचा इंग्रजांशी फार संबंध आलेला दिसत नाही. पुढे छ. शाहूच्या काळात मराठे इंग्रज संबंध हे मुख्यत्वे आंग्रे इंग्रज संबंध असे म्हणावे लागेल. पुढे तुळाजी प्रकरणात इंग्रजांना मराठ्यांच्या प्रत्यक्ष राजकारणात भाग घेण्याची संधी नानासाहेब पेशव्याने उपलब्ध करून दिली . पुढे पानिपतच्या पराभवानंतर नानासाहेब वारले आणि थोरले माधवराव पेशवे झाले. या पेशव्याच्या काळात इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणात चंचू प्रवेश करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही . माधवरावांच्या मृत्यूनंतर राघोबा दादाने ती संधी इंग्रजास उपलब्ध करून दिली आणि त्यावरून इंग्रज मराठा संघर्ष उभा राहिला. यास पहिले इंग्रज मराठा युद्ध असे संबोधले जाते . या युद्धात नाना फडणीस, महादजी शिंदे, तुकोजी होळकर आदी नेत्यांनी एकत्रित पणे इंग्रजांशी लढा देऊन मराठेशाई वाचवली. पुढे पेशवे सवाई माधवराव यांच्या मृत्यूनंतर झालेल्या सुंदोपसुंदी मध्ये रघुनाथ पुत्र बाजीराव दुसरे (ज्यांना आपण यापुढे रावबाजी म्हणून संबोधणार आहोत) ते पेशवे झाले. या रावबाजीचा राज्य कारभाराचा सुरुवातीचा काळ अनेक राजकीय गुंतागुंतींनी भरलेला आहे आणि ती चर्चा मोठी आहे . थोडक्यात आवरायचे झाले तर विठोजी होळकराच्या प्रकरणात रावबाजीचे यशवंतराव होळकरांशी वाकडे आले. हडपसर येथे पेशवे -शिंदे यांच्या संयुक्त सैन्याचा यशवंतरावांनी पराभव केला. पेशवे पद टिकवण्यासाठी रावबाजीने इंग्रजांशी सुरत येथे वसईचा तह केला (१८०२ं). त्याबदल्यात इंग्रजांनी रावबाजीला पेशवाईवर पुनश्च बसवले आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली . यातून पुढे इंग्रज-रावबाजी विरुद्ध होळकर-शिंदे युद्ध पेटले आणि इंग्रज-रावबाजी पक्षाचा यात विजय झाला. यासच दुसरे इंग्रज-मराठा युद्ध म्हणतात. हे युद्ध म्हणजे मराठेशाहीच्या अंताची नांदी होती .
इथे वसईच्या तहाची कलमे लक्षात घेणे आवश्यक आहे :-
·
या तहाद्वारे पेशव्याने सहा बटालियनची (६००० सैनिक) फौज स्विकारली. यात कायमस्वरूपी देशी पायदळाचा समावेश होता आणि त्याला युरोपियन तोफखान्याची व इतर शस्त्रास्त्रांची जोड होती. हे सारे सैन्य पेशव्याच्या मुलुखात कायमस्वरूपी राहणार होते.
·
या फौजेच्या खर्चासाठी वार्षिक सव्वीस लाख रूपये उत्पन्नाचे जिल्हे कंपनीला तोडून देण्यात आले होते.
·
या तहाद्वारे पेशव्याने त्याचे सुरतवरील सर्व अधिकार सोडून दिले.
·
कंपनी व बडोद्याचे गायकवाड यांच्यात जे करारमदार झाले त्यांना पेशव्याने मान्यता दिली.
·
पेशव्याचे गायकवाड व निजामाशी जे वाद होते ते सर्व मध्यस्थीसाठी कंपनीकडे सोपविले.
·
इतर सत्तांशी भविष्यात ब्रिटिशांच्या पूर्वपरवानगीशिवाय युद्ध किंवा तह न करण्याचे पेशव्याने मान्य केले.
या तहामुळे पेशवा हा इंग्रजांचे हातचे बाहुले बनला. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी त्यास इंग्रजांची परवानगी घ्यावी लागे. इ .स १८०२ च्या वसईच्या तहाने रावबाजी इंग्रजांचा मांडलिक झाला होता. १८०५ पर्यंत शिंदे, भोसले, होळकर हेही इंग्रजी तहात बांधले गेले. सातारकर व करवीरकर छत्रपती यांची स्वतःची विशेष ताकत नव्हतीच. एकुणात आता इंग्रजां विरुद्ध १७७३ प्रमाणे मराठ्यांच्या एकजुटीची कोणतीही शक्यता उरली नव्हती. शिवाय पटवर्धन, पानसे, निपाणकर वगैरे सरदारांशी पेशव्याचे काही न काही खटके उडालेच होते. या सरदारांकडून रावबाजी सतत कोणत्या न कोणत्या कारणाने खंडण्या उकळत असे. शेवटी वैतागून या जहागीरदारानी इंग्रजांकडे दाद मागितली. मग इंग्रजांनी १८१२ साली एक नवीन व्यवस्था अमलात आणली. त्यानुसार या जहागिरदारांनी पेशव्याचा मान राखावा, आपल्याकडील अतिरिक्त मुलुख सोडून द्यावा वगैरे गोष्टी पाळण्याचे बंधन त्यांच्यावर आले. उलट इंग्रजांच्या परवानगी शिवाय या जहागिरदारांचे मुलुख पेशव्याने जप्त करून नयेत असे बंधन पेशव्यावर आले. विशेष म्हणजे या जहागीदारां बरोबर स्वतंत्र करार मदार करण्याची मुभाही इंग्रजांनी घेतली . आता जवळपास सर्वच मराठा सरदारांच्या चाव्या इंग्रजांच्या हातात पडल्या. याच परिस्थितीमुळे बहुदा १८१२ च्या नंतर रावबाजीच्या मनात इंग्रजांशी दोन हात करून स्वतास मुक्त करून घ्यायचे विचार सुरु झाले असावेत.
अहमदाबादच्या वसुलीवरून रावबजीचे गायकवाड याच्याशी मतभेद होते. त्या व इतर काही व्यवहारातून पेशवा गायकवाडांकडे सुमारे अर्धा कोट रुपये मागत होता . त्या संबंधाने बोलणी करण्यासाठी गायकवाड यांकडून गंगाधर शास्त्री हा माणूस पुण्यास आला होता. हा इंग्रजांचा खास इसम होता आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतली होती. या गंगाधर शास्त्र्याचा २७ जुलै १८१५ रोजी पंढरपूर येथे खून झाला. या खुनामागे पेशव्याचा खास माणूस त्रिम्बकजी डेंगळे व खुद्द पेशवा आहे अशी इंग्रजांची खात्री होती. पण रावबाजी ला थेट आरोपी न ठरवता इंग्रजांनी त्याच्याकडे त्रिंबकजीला ताब्यात देण्याची मागणी केली. रावबाजीने बरीच चाल ढकल करून पहिली. इंग्रज ऐकेनात तेव्हा तो युद्धाची भाषा करू लागला. मग एल्पिस्टन ने शिरूर वरून इंग्रजी फौज मागवली. मग मात्र पेशव्याचे धाबे दणाणले व त्रिम्बकजीला इंग्रजी हातात सोपवण्यात आले. पण १८१६ मध्ये ठाण्याच्या तुरुंगातून त्रिम्बकजी पळाला. त्यामागेही पेशवाच आहे अशी इंग्रजांची खात्री होती. पुन्हा इंग्रजांनी रावबाजी कडे त्रिम्बकजी साठी तगादा लावला. यानंतर इंग्रजांशी रावबाजीचे संबंध उत्तरोत्तर बिघडत गेले.
मे १८१७ मध्ये इंग्रजांनी रावबाजीस त्रिंबकजीस एका महिन्याच्या आत स्वाधीन करावे आणि त्रिंबकजी स्वाधीन होईपर्यंत सिंहगड, रायगड आणि पुरंदर जामीन म्हणून इंग्रजांचे स्वाधीन करावे अशी तंबी भरली. रावबाजीने पुन्हा टोलवाटोलवी करून पहिली. पण ८ मे १८१७ रोजी एलपीस्टन ने पुणे शहरास वेढा दिला आणि नाकेबंदी केली. मग मात्र पेशव्याने त्रिंबकजीस पकडन्यासाठी जाहीरनामे काढले आणि उपरोक्त तिन्ही किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन केले. मग एलपीस्टन ने वेढा उठवला. यावेळी इंग्रजांनी रावबाजी बरोबर एक करार केला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो.(१९३२ साली झालेला पुणे करार वेगळा). या कराराद्वारे इंग्रजांनी पेशव्याच्या उरल्या सुरल्या मुसक्याही आवळल्या. पुणे कराराची कलमे खालील प्रमाणे.
पुणे तह - १३ जून १८१७
१. वसईचा तह कायम राहील शिवाय,
२. पेशव्याने त्रिंबकजीस गंगाधर शास्त्र्याचा खुनी म्हणून मान्य केले आणि त्यास इंग्रजांचे स्वाधीन करण्यास कबुली दिली.
३. त्रिंबकजिस अटक होईपर्यंत त्याचे कुटुंब इंग्रजांच्या ताब्यात राहील.
४.सरदार, दौलतदार यांच्या कडील अकाबारनीस कारकून, वकील यांस पेशव्याने दरबारी ठेऊ नये. काही सवाल जबाब करावयाचे असले तर ते इंग्रजां मार्फत करावे.
५.इंग्रजांशी स्नेह असलेल्या करवीर, सावंतवाडीकरांवर पेशव्याने काही हक्क सांगू नये.
६. रावबाजीने इंग्रजांचे ५००० स्वार, ३००० पायदळ, तोफखाना यांचा खर्च चालवून ते स्वतः पाशी ठेवावे. त्यासाठी तोडून दिलेल्या ३४ लक्ष मुलुखावर आणि किल्यावर हक्क चालवू नये.
७. अहमद नगर च्या किल्ल्या भोवतालची ४००० हात चौफेर जमीन पेशव्याने इंग्रजांस द्यावी.
८. इंग्रज तैनाती फौजेपेक्षा कितीही फौज पेशव्याच्या मुलुखात ठेवतील त्यास पेशव्याने हरकत घेऊ नये.
पुण्यात या सर्व घटना घडत असतांना उत्तरेत आणि मध्य भारतात पेंढाऱ्यांचा उपद्रव वाढतच होता. पेंढारी हे लोक मोगलशाहीच्या पडत्या काळात (औरंगझेबाच्या शेवटच्या २० वर्षात) प्रथम पुढे आले. पेंढारी म्हणजे पूर्ण प्रशिक्षित सैनिक नसत. यांना सरकारकडून पगार नसे, मात्र शत्रूच्या प्रदेशात खंडणी वसूल करताना तिच्यापैकी कांही ठराविक भाग यांना मिळे. मुख्य लढाई नंतर शत्रूची धान्यसामुग्री लुटणे व त्यांच्या देशाची खराबी करणे हे काम यांच्याकडे असे. हे घोडेस्वार असून यांचे घोडे फार चपळ असत. यांच्या वेगवेगळ्या टोळ्या असत व त्यांचे वेगळे नायक ही असत. १८१६ पर्यंत अनेक सरदारांनी, संस्थानिकांनी आपले संरक्षण इंग्रजांकडे सोपवले होते. (याला तैनाती फौजेचा करार म्हणून ओळखले जाते). त्यामुळे त्यांच्या मुळच्या सैन्यातील सैनिकांना एकतर इंग्रजांकडे नोकरी पत्करावी लागे वा या पेंढारी टोळ्यात सामील व्हावे लागे. १८१० च्या दशकात या पेंढाऱ्यांचा पृथक पृथक टोळ्या होत्या व त्यांचा वेगळा नेता असे. (उदा.मीरखान वगैरे). त्यांनी मध्यप्रांत, माळवा, गुजराथ, महाराष्ट्र, मद्रास, बिहार वगैरे प्रांतात धुमाकूळ घातला. स्वत:चे स्वातंत्र्य नष्ट झाल्यामुळे रुष्ट झालेले बरेचसे संस्थानिक त्यांना आंतून मदत करीत. इंग्रजांच्या किरकोळ बंदोबस्ताने पेंढारी टेकीस येईनात. म्हणून इंग्रजांनी पेशवे, शिंदे आदी सरदारांकडे मदत मागितली. रावबाजीने या संधीचा उपयोग सैन्य उभारणी साठी करून घेतला. त्याने आतून शिंदे , होळकर, नागपूरकर भोसले, सातारकर छत्रपती याच्याशी संधान बांधले. फौज उभी करण्यासाठी पैसा पुरवला. बापु गोखले यांनी पटवर्धन, रास्ते, विंचूरकर याच्या मदतीने फौजा उभ्या केल्या. इंग्रजही भोळसट नव्हते. या कार्यक्रमाचा अर्थ त्यांच्याही लक्षात आला होता. त्रिम्बकजी वरून पेशवे इंग्रज संबध विकोपास गेले होते. रावबाजी वरपांगी पेंढाऱ्यांचा विरुद्ध फौज उभी करत आहे पण आतून त्यांनाच सामील आहे असा त्यांचा पक्का समज होता.
१७७२ मध्ये ज्या मराठा महामंडळाने एकत्र येऊन इंग्रजांशी मुकाबला केला आणि त्यांस जरी संपूर्ण नेस्तनाबूत जरी नाही केले तरी तुल्यबळ लढत देऊन मराठा साम्राज्य राखले त्या मराठा महामंडळातील शिंदे, होळकर, पेशवे वगैरे आधारस्तंभांची इंग्रजांनी कशी छकलें करून प्रत्येकास वेगवेगळी वेसण घालून आपल्या दावणीस कसे बांधले हे वरील चर्चेवरून लक्षात येईल .
पेशव्याची युद्ध तयारी :-
रावबाजीला जवळपास सर्व इतिहासकारानीं पळपुटा नालायक राज्यबुडवा ठरवले आहे. पण या पेशव्याने युद्धाची जी तयारी केली होती तेही जरा पाहण्यासारखी आहे.
१. नागपूरचा इंग्रजी एजंट जेनकिन्स याने गव्हर्नर जनरल यास लिहिलेल्या पत्रात (फेब्रुवारी १८१४) पेशवे आणि भोसले (नागपूरकर) यांच्यात इंग्रजांविरुद्ध सुरु असणाऱ्या खलबतांचा उल्लेख केलाय. यात पेशव्याच्या नेतृत्वाखाली संभाव्य इंग्रजविरोधी युतीचा उल्लेख आहे.
२. फेब्रुवारी १८१५ मध्ये रणजित सिंग यांच्या दरबारात संपूर्ण भारतात इंग्रज विरोधी युती करण्याच्या संबंधी बोलणी करण्यासाठी रावबाजीचा माणूस असल्याचा उल्लेख आहे.
३. सप्टेंबर १८१५ मध्ये नागपूरच्या इंग्रजी रेसिडंट ला बातमी मिळाली की नागपूरकर भोसले यांनी एक गुप्तहेर हैद्राबादेस काही खास कामगिरीवर पाठवला आहे. याशिवाय त्रिंबकजी डेंगळे याने भोसल्यास पत्र लिहून "बोलावताच शिंदे होळकर यांच्या बरोबर इंग्रजविरोधी युतीत सामील व्हावे " असे कळवले आहे असे हा एजंट म्हणतो.
४. असेच एक पत्र शिंदे याचा आप्त हिंदुराव घाटगे यास पाठवले गेले.
५. बाळोजी कुंजिर हा पेशव्याचा माणूस वेगवेगळ्या राज्यांना भेटी देत असल्याचा उल्लेख एलपीस्टनने केलाय. एलपीस्तन ने शंका घेतलीये की याच्या मागे इंग्रज विरोधी आघाडी चे राजकारण शिजतंय.
६. १८१६च्या शेवटी रावबाजीने अप्पासाहेब भोसले याना योग्य वेळ आली की सैनिकी साहाय्य करण्यासाठी निरोप दिलाय अशी बातमी नागपूरच्या इंग्रजी एजंटास मिळाली असा उल्लेख आहे .
७. जुलै १८१६ मधे आप्पासाहेब भोसले, शिंदे आणि पुणे येथील वकील यांची गुप्त बैठक झाल्याचे नागपूचा एजंट जेनकिन्स म्हणतो.
८. अशीच बैठक शिंदे, पेंढारी प्रमुख आमिरखान आणि होळकर यांच्यात झाली असल्याचा उल्लेख आहे.
९. सप्टेंबर १८१६ मध्ये इंग्रजांनी गुलाब आणि परमानंद या दोन इसमांना शिंदे यांनी नेपाळला लिहिलेली गुप्त पत्रे घेऊन जाताना पकडले.
१०. रावबाजीने होळकरांचे साहाय्य मिळवण्यासाठी गणेशपंत पिटके आणि धोंडोपंत तात्या नावाचे वकील होळकरांकडे पाठवले होते. शिंदे, होळकर, आमिरखान आणि जालीमसिंग कोटेकर अशी इंग्रज विरोधी आघाडी उघडण्याचा त्याचा बेत होता.
११. ग.ज. हेस्टिंग्स च्या ६ सप्टेंबर च्या रोजनिशीतील उताऱ्यात रावबाजीने ब्रम्हदेशाच्या बादशाहाशीही इंग्रजांविरुद्ध संधान बांधले असल्याचा उल्लेख आहे.
हे सर्व आपल्यास माहित असलेले उल्लेख आहेत. इतिहासाच्या उदरात आपणास माहित नसलेले कितीतरी उल्लेख गडप झाले असतील. यावरून रावबाजी, ज्यास कोणतेही राजनैतिक, लष्करी शिक्षण मिळाले नाही आणि ज्याच्या नशिबी इतिहासाने केवळ नाकर्तेपणाचा शिक्का मारलाय त्याने या युद्धाची केलेली तयारी पाहून अचंबित व्हायला होते.
इंग्रजी तयारी :
दुर्दैवाने इंग्रजास या सर्व प्रयत्नांची माहिती होती. पुण्यात एलपीस्टननेही आपले गुप्तहेर जाळे विणले होते. यात बाळाजीपंत नातू हे नाव अग्रणी घ्यावे लागते. पेशव्याच्या प्रत्येक हालचालींची बित्तम-बातमी तो एलपीस्टन ला देत असे. रावबाजीने त्याची आणि एलपीस्टनची मैत्री चांगलीच ओळखली होती. रावबाजीने नातूंस वाळवून घेण्यासाठी प्रति मास ५०० रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. पण एलपीस्टनने तितकीच रक्कम देऊ केली आणि नातूंनी इंग्रजांची बाजु घेतली. या बाळाजीपंत नातूंनी ३००० रुपयात पेशव्याच्या कारकुनांना फितवून अनेक महत्वाची माहिती इंग्रजांना उपलब्ध करून दिली. अर्थात नातू हे एकाच नाव नाहीये. गणेशपंत नामक कोणी एक व्यक्तीला गद्दारीसाठी इंग्रजांकडून ५०० रुपये बक्षिसी मिळाल्याचे उल्लेख आहेत. या गणेशपंतांचा मासिक पगार ५० रुपये होता. बापू भट (आंगऱ्यांचा दिवाण आणि साताऱ्यातील चिटणीस), प्रभाकर बल्लाळ हा अमृतराव पेशव्याचा वकील अशी ही यादी लांबतच जाईल .
पुणे करार झाल्यावर रावबाजी पंढरपूर आणि मग माहुलीस गेला . माहुलीतील मुक्कामात इंग्रजांशी बिघाड करण्याची मसलत आकार घेऊ लागली. बापू गोखले यांस प्रमुख सेनापती नेमण्यात आले आणि युद्ध तयारी साठी एक करोड रुपये देण्यात आले. बापूने फौजेत जोरदार भरती चालू केली. कुस्त्यांच्या दंगली घडवून त्यातून माणसे निवडून त्यांना फौजेत भरती करण्यात आले. अर्थात वरवर ही फौज पेंढाऱ्यांशी लढण्या करीता जमवली जात होती. बापू गोखल्याना पेशव्याचा चंचल स्वभाव चांगलाच ठाऊक होता. त्यामुळे "तुमच्या शिवाय दुसऱ्या कोणाचाही सल्ला मी ऐकणार नाही, तुमच्याच सांगणी प्रमाणे मी वागेन "असा स्वदस्तुरचा लेख बापू गोखल्याने रावबाजी कडून लिहून घेतला. किल्ल्यांची डागडुजी केली गेली. धुळपांना आरमार सज्ज करण्यास सांगितले गेले (अर्थात मराठा आरमाराने पहिल्या इंग्रज मराठा युद्धातही फारसा सक्रिय सहभाग घेतला नव्हताच दुसऱ्या आणि तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील मराठा आरमाराच्या सहभागाबाबत माझ्याकडे कोणतेही संदर्भ नाहीत). गोविंद राव काळे, अन्याबा मेहेंदळे, दादा गद्रे, रघुपंत थत्ते यांच्या सारख्या जुन्या सरदारांचे मन वळवून घेतले गेले. पेंढाऱ्यांचा पुढारी मिरखान यांच्याशी गुप्तहेर पाठवून बोलणी झाली. नागपूरकर भोसले याना "मानाची वस्त्रे" पाठवण्यात आली. सातारकर छत्रपतींना या सर्व मसलतीची माहिती देण्यात आली. युद्ध काळात सातारकर छत्रपतींस वासोटा या दुर्गम किल्ल्यावर पाठवण्यात आले. रावबाजीचे सातारकर छत्रपतींबरोबरचे पूर्वीचे वागणे अजिबात चांगले नव्हते. त्यामुळे सातारकर छत्रपती मनातून पेशव्यांवर नाराजच होते. नाना श्रौती, यशवंतराव घोरपडे यांच्यावर इंग्रजी फौजेत फितूर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मागे (बहुदा १८१२ मध्ये ) पेशव्याने प्रसंगी उपयोगास पडावी म्हणून कॅप्टन फोर्ड यास नोकरीस ठेऊन एक कवायती पलटण उभी केली होती. ही पळटण बनवण्याचे कारण काय आणि किती संख्येची होती ते समजत नाही पण बहुदा १००० सैनिक या पलटणीत असावेत. या फोर्डचा आणि पेशव्याचे कारभारी मोरोपंत दीक्षित यांचा खूप स्नेह होता. मोरो दीक्षित हा फोर्डला बातम्या पुरवे अशीही वदंता होती. या मोरो दीक्षितांनी फोर्ड ला फोडून रावबाजीच्या बाजूने लढावे यासाठी बरीच मुसद्देगिरी करून पहिली, पण फोर्ड कंपनीशी एकनिष्ठ राहिला. पण या दोघांनी दोस्तीस स्मरून जर मोरो दीक्षित किंवा फोर्ड या पैकी कोणी लढाईत पडले तर दुसऱ्र्याने पडलेल्याच्या कुटुंबांची काळजी घ्यायची अशी वचने एकमेकास दिली .
सप्टेंबरच्या अखेरीस रावबाजी माहुलीवरून पुण्यास आला. १४ ऑक्टोबर १८१७ रोजी त्याची आणि एलपीस्टनची भेट झाली. त्यात रावबाजीने दसर्यानंतर आपली फौज पेंढाऱ्यांविरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांच्या मदतीस जाईल असे आश्वासन एलपीष्टणास दिले. ही त्याची एलपीस्टन बरोबरची शेवटची भेट होय. एलपीस्टनचा पेशव्याच्या वरती असलेला संशय वाढतच होता. जमलेली फौज ही पेंढाऱ्यांशी लढण्यासाठी नसून पेशवे इंग्रजांशीच लढाई करणार ही त्याची मनोमन खात्री पटली होती. ऑक्टोबरच्या अखेरीस पेशव्याच्या युद्धाच्या तयारीस प्रत्यक्ष आकार येऊ लागला. ठीक ठिकाणून फौजा पुण्यात जमा होऊ लागल्या. १९ ऑक्टोबर १८१७ रोजी पुण्यात दसऱ्याच्या निमित्त सैन्य संचलने झाली. सलामी घेताना नारोपंत आपटे यांच्या स्वारांची इंग्रजी सैनिकांशी काहीतरी कुरबुर झाली आणि पेशवे इंग्रजी सलामी न घेताच परतले. इथूनच वातावरण चिघळण्यास सुरुवात झाली.
पुण्यातील मराठ्यांच्या फौजेचे आकडे खालील प्रमाणे :-
पेशव्याची फौज :-
(ग्रँड डफ च्या नुसार)
१. घोडदळ -१८०००
२. पायदळ - ८०००
३. तोफा - १४
४. नागा गोसावी सैन्य - ३०००
रियासतीतील माहिती : -
१. बापू गोखले - १५००० (बव्हंशी घोडदळ )
२. आबा पुरंदरे - ३०००
३. विंचूरकर - १००००
४. नारोपंत आपटे - २०००
५. मिरजकर - २०००
६. पटवर्धन , रास्ते , थोरात , जाधव - प्रत्येकी २०००
७. फादर पिंटो नावाच्या पोर्तुगीज सेनानी च्या नेतृत्वाखाली ३००० अरब सैनिक
स्वतः पेशवे ५००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन पर्वतीवर राहणार होते . एकुणात सर्व साधारण अंदाज केला तर किमान १८००० घोडदळ , ८००० पायदळ आणि २० तोफा अशा मराठा सैन्याचा आकडा धरता येईल . यात ३००० गोसावी सैन्य गृहीत धरले आहे .
इंग्रजी फौज :-
१. कर्नल बर्र च्या नेतृत्वाखाली वर सांगितलेली १२०० सैनिकांची पलटण
२. एलपीस्टन ने युद्धाची कुणकुण लागल्यावर अहमद नगर आणि मुंबई येथील युरोपिअन पलटणी पुण्यास बोलवून घेतल्या. यांचा आकडा मिळत नाही . मुंबईतील फौज ३० ऑक्टोबर ला पुण्यास आली.
३. कप्तान फोर्ड ची वर उल्लेखित पलटण - १००० सैनिक.
एकूण इंग्रजी फौज ३००० पायदळ आणि ८ तोफा यांपेक्षा जास्त नव्हती . थोडेफार घोडदळही इंग्रजी फौजेत असावे.
पेशव्याचे सेनानी विठ्ठल नरसिंह विंचूरकर हे ब्रिगेडियर स्मिथ च्या बरोबर काही दिवस होते. त्यांनी इंग्रजी फौजेतील शिस्त जवळून पहिली होती. त्यांनी पेशव्यास "इंग्रजांशी सध्या बिघाड न करण्याचा" सल्ला दिला. पण रावबाजीने तो ऐकला नाही. तरीहि विंचूरकर पेशव्याची आज्ञा मानून ससैन्य हजर झाले होते. गोविंदराव काळे या सेनानीचे म्हणणेही युद्धाच्या विरोधात होते. त्यांच्या मता नुसार "तूर्त इंग्रजांशी लढाईचा प्रसंग आणू नये. तुमचा सरंजाम नवा. काल चाकर झालेला आज लढून मरतो असे नाही. वर्षे दोन वर्षे फौज अशी बाळगावी व इंग्रजांशी सख्य आहे तेच चालवावे. दुसरे लढाईचा प्रसंग शहराजवळ (पुण्याजवळ) करू नये. एखादी मोहीम परराज्यात सरकारची बाहेर काढावी आणि इंग्रजांस समागमे घेऊन जावे आणि तिकडे गेल्यावर लढाईचा प्रसंग काढावा तो करता येईल. सध्या लढाई उभी केली असता इंग्रज म्हणजे हटला जातो असे घडत नाही." पुढे जे काही झाले ते या भाकिताशी किती तंतोतंत जुळते ते पाहून या गोविंदरावांची मसलत नाकारून रावबाजीने युद्धाची घाई केली असा नित्कर्ष निघतो. गणपतराव पानसे हे मराठा तोफखान्याचे प्रमुख होते. विंचूरकर घराण्याचा इतिहास या पुस्तकात त्यांचा रावबाजीस दिलेला जबाब दिला आहे तो असा :-"सरकारांनी तोफखान्यात सुद्धा इंग्रजी कवायती फौज आपले जवळ ठेवल्यामुळे आजपर्यंत प्रसंगोपात जी कामे पडली ती त्यांच्या कडूनच बजावण्यात आली. खालसा तोफखान्यास मुळीच काम पडत नसल्यांमुळे हल्ली दारुगोळा वगैरेची तयारी अगदी नाही. आता नवीन करायची ठरली तर श्रीमंतांनी जी मुदत दिली आहे, त्या मुदतीत पाहिजे तशी तयारी होणे अशक्य आहे. तथापि मजकडून होईल तितकी तयारी करण्यास मी बिलकुल कसर करणार नाही." यावरून मराठा सैन्य संख्यने जास्त असले तरी तयारीच्या बाबतीत किती मागे होते हे कळते. इंग्रजांनी तैनाती फौज भारतीय राजांच्या गळी मारून त्यांचे क्षात्र तेज कसे झोकाळून टाकले हे लक्षात घेण्यासारखे आहे. याच बरोबर पेशवे प्रभूती लोकांनी स्थानिक लढवय्या समाजाला नाकारून अरबी,गारदी यांवर विश्वास दाखवला. त्यामुळे इथला मूळचा स्थानिक लढवय्या समाजाला जर परकीयांची नोकरी करणे इष्ट वाटले तर त्यात गैर ते काय?
इंग्रजांवीरुद्ध समशेरीस हात घालण्यास आतुर होते ते म्हणजे बापू गोखले. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे कुणीही माणूस रावबाजीकडे मसलतीसाठी आला तर पेशवा त्यास "तुम्हास जे काही कळवणे असेल ते बापूस कळवा" असे सांगे. त्यामुळेच वर उल्लेखित काळे विंचूरकर यांचे सल्ले पेशव्याने न ऐकता बापू कडे पाठवले आणि बापूने ते उडवून लावले. उपलब्ध सैन्य संख्येच्या बळावर इंग्रजी फौज आपण सहज उधळून लावू असा त्यांना विश्वास असावा. वास्तविक बापू गोखले हे वेलस्ली बरोबर असाये च्या लढाईत इंग्रजांच्या बाजूने उपस्थित होते. जास्त सैन्य संख्या असूनही असायेच्या लढाईत भोसले-शिंदे यांच्या कवायती फौजांचा इंग्रजांकडून पराभव झालेला त्यांनी पहिला होता. पण महादजींनी जसे वडगावच्या लढाईत दग्दभू धोरण आणि गनिमी कावा वापरून इंग्रजांना शरण आणले तसेच डावपेच वापरून आपण इंग्रजास हरवू अशी त्यांची योजना असावी. शेवटी पेशव्याने बापू गोखले यांचीच योजना स्वीकारली.
२८ ऑक्टोबर १८१७ रोजी पुण्यात सैन्याची मोठी धामधूम उडाली. तोफांना बैल जोडले गेले. बापू गोखले यांनी पेशव्याकडे हल्ल्याची परवानगी मागितली. पण युद्ध करावे की नाही, करावे तर आज की नंतर या द्विधा मनस्थितीत रावबाजी होता. हल्ल्याची परवानगी मिळालीच नाही. २९ तारखेस हल्ला न करण्याची चूक फार गंभीर होती. एकतर मुंबई आणि नगर येथील पलटणी अजून पुण्यास पोहोचल्या नव्हत्या. एकट्या कॅप्टन फोर्ड आणि कर्नल बर्र ची पलटणे पुण्यात होती. त्यातील बर्र ची पलटण गारपिरावर होती. आणि मराठा फौजांनी वेढलेली होती. हल्ला करून त्यांचा पराभव करणे बरेच सुलभ होते. शिवाय जर एलपीस्टन हाती लागला असता तर मराठ्यांस व्यूहात्मक फायदा ही मिळाला असता. शिवाय आपण इंग्रजांस हरवू शकतो असे सैनिकांचे नैतिक मनोधैर्यही उंचावले असते. २९ ऑक्टोबरला हल्ला न करून मराठ्यांनी विजयाची सुवर्ण संधी दवडली असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. २८ ची रात्र एलपीस्टन ने जागून काढली. ग्रँड डफ त्याच्या बरोबर होता. हल्ला न झाल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असणार यात शंका नाही. २९ ऑक्टोबर ला एलपीस्टनने पेशव्यास निरोप पाठवला की गारपिरवर मराठा फौज त्याच्या फौजेच्या अगदी हद्दीवर आहेत त्या काढून घ्याव्या. पण पेशव्याने काही एक हालचाल केली नाही. तेव्हा युद्ध अटळ आहे हे एलपीस्टन समजून चुकला.
नोव्हेंबर १ रोजी गारपिरावरील बर्र ची फौज त्याने हटवली आणि मुळा नदी पार करून त्याने खडकीच्या दिशेने वाट धरली. १-२ नोव्हेंबर ला खडकीत त्याने छावणीची व्यवस्था लावली . इंग्रजी सैन्याची डावी बगल आज जिथे होळकर पूल आहे तिथुन खडकी च्या मैदाना पर्यंत पसरली होती. या रांगेच्या पिछाडीस मुळा नदीचा प्रवाह वाहत होता. मुख्य फायदा हा होता की कॅप्टन फोर्ड ची पलटण जी नदीच्या पलीकडे दापोडीस होती ती गरजेनुसार नदी ओलांडून पटकन बर्र च्या पलटणीस मिळू शकत होती. तशी नदीपार करण्याची जागाही शोधून ठेवण्यात आली होती. बर्रच्या फौजेने गारपीराची छावणी सोडल्यावर मराठ्यांनी छावणी लुटूली. २ नोव्हेंबर रोजी गणेश खिंडीत पेशव्याच्या विश्रामसिंग नामक नाईकाची ले.शॉ याच्याशी बाचाबाची झाली आणि विश्राम सिंगने त्यास भाल्याने जखमी केले. एलपीस्टनने ताबडतोब याचा जाब विचारला. पेशव्यानेही लगेच तपासाचे नाटक केले. या सर्व प्रकारचा जाब विचारण्याची जबाबदारी एलपीस्टने फोर्ड वर सोपवली. फोर्ड आणि मोरो दीक्षित यांची भेट ५ नोव्हेंबर १८१७ ला सकाळी झाली. याच वेळी फोर्ड आणि त्याची बटालियन मराठ्यांच्या बाजुने लढावी म्हणून मोरोपंतांनी प्रयत्न केला. फोर्ड मानेना तेव्हा निदान त्याने निष्क्रिय राहावे यासाठीही प्रयत्न केला. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी फोर्ड आणि त्याची पलटण इंग्रजांकडून लढली. ५ रोजीच दुपारी विठोजी गायकवाड नावाचा इसम संगमावरील रेसिडेन्सी त राहत असलेल्या एलपीस्टनला भेटण्यास आला. त्याने रावबाजीचा निरोप म्हणून सांगितले की "तुम्ही जे इंग्रजी सैन्य जमा केले आहे ते दूर कोठेतरी पाठवून द्यावे आणि जे नेटिव्ह सैन्य आहे ते पेशवे सांगतील तिथे पाठवून द्यावे नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील". एलपीस्टन ने अर्थातच ही मागणी फेटाळून लावली. एलपीस्टन ऐकत नाही हे पाहून बापू गोखले वगैरे सेनानींनी हल्याचा विचार पक्का केला. (याच कालावधीत मराठ्यांच्या निशाणाची काठी मोडल्याचा आणि अपशकुन झाल्याचा उल्लेख येतो .पण नक्की तारीख समजत नाही). ५ नोव्हेंबर ला सकाळी रावबाजीने हल्ल्याचा आदेश दिला. बापूने पेशव्याच्या पायावर डोके ठेवले व रावबाजीनेही त्याला "बाळाजी विश्वनाथाचे पुण्य तुम्हास तारो" आशीर्वाद दिला. पेशव्यांनी युद्ध नेतृत्व करण्याचे दिवस केव्हाच संपले होते. बापू सेनापती होता आणि तोच लढाईचे नेतृत्व करणार होता. पेशवे रावबाजी ५००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन पर्वतीवर गेले. तेथून ते युद्ध पाहणार होते. पेशव्याचे सैन्य खडकीच्या दिशेने इंग्रजी सैन्यावर चढाई करण्यासाठी निघाले. मराठा सैन्याची डावी बाजू चतुःशृंगी च्या मंदिराच्या पासून सुरु होऊन संगमावरील रेसिडेंसीच्या मधील सर्व मैदानात ते पसरले होते. एलपिस्टनने सर्व रागरंग पाहून रेसिडेन्सी सोडून खडकीच्या छावणीत जाण्याचा निर्णय घेतला. जाण्याआधी त्याने अनेक महत्वाची कागदपत्रे जाळून टाकण्याची दक्षता घेतली. पळून जात असताना तो विचूरकरांच्या पथकाच्या टप्प्यात होता. पण आश्चर्यकारक रित्या त्यास कोणताही अटकाव केला गेला नाही. तो सहीसलामत खडकीच्या छावणीत पोहोचला. दुपारी ३ वाजता मराठ्यांनी रेसिडन्सीवर हल्ला चढवला आणि ती जाळून टाकली.
मराठा डावी बगल मोरो दीक्षित , विंचूरकर सांभाळत होते. मध्य भागी मराठ्यांचा तोफखाना होता. आणि उजवी कडे बापू गोखले यांचे सैन्य होते. मराठ्यांचे निशाण बहुदा इथेच असावे. अगदी उजवीकडे फादर पिंटो आणि त्याचे सैन्य होते. गोसावी सैन्यही मराठ्यांच्या उजव्या बगलेवर होते. मराठ्यांकडून प्रथम तोफांचा मारा करण्यात आला. पहिले पाच गोळे पडल्यावर इंग्रजी तोफ़ानीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. डावी कडून मोरोदिक्षित कॅ. फोर्ड च्या पलटणीस भिडले. त्यांचे उद्दिष्ट फोर्डच्या सैन्याचा बर्र च्या पालटणीशी मिलाफ टाळणे हा होता. तत्पूर्वी त्यांची बापु गोखले यांच्याशी काही वादावादी झाली होती. बापू गोखले याना मोरो दीक्षित यांच्या इमानदारीवर विश्वास नसावा. या वादावादीच्या रागाच्या भरात मोरो दिक्षित इंग्रजी फौजांना भिडले व तोफेच्या माऱ्यात सापडून ठार झाले. मोरो दीक्षित मारले गेले ती जागा नक्की कुठे ते समजत नाही. मोरो दीक्षित पडल्यावर नेतृत्वहीन मराठा डावी बगलेची फौज मागे हटली. विंचूरकरांच्या फौजेनेही फोर्ड ला अडवण्याचा प्रयत्न केला पण फोर्ड सहज पणे रात्रीपर्यंत खडकीच्या बर्र च्या पलटणीस मिळाला होता.
मराठ्यांच्या उजव्या बगलेवरील फादर पिंटोच्या अरब तुकडीने आणि गोसावी सैन्याने इंग्रजी डाव्या बगलेवर हल्ला चढवला . पण इंग्रजी बंदुकांच्या माऱ्यापुढे त्यांचे काही चालले नाही. पण यामुळे इंग्रजी मध्य आणि डावी बगल यांच्यात पोकळी निर्माण झाली. या धुमश्चक्रीत बहुदा फादर पिंटो मारला गेला. ही संधी साधून बापू गोखले यांनी आपले ६००० घोडदळ त्या पोकळीत घुसवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न हा इंग्रजी पायदळाची पिछाडी गाठण्याचा होता. सर्व साधारणपणे अशा युद्धात शत्रूचे पायदळ पथक आपल्या पायदळाकडून रोखून मग बगलेकडून घोडदळ हल्ला करून त्या पायदळास घेरून मग त्यांची कत्तल केली जाते. मात्र मराठ्यांचे दुर्दैव आडवे आले. बापूंच्या घोड्यास गोळी लागून तो पडला आणि काही वेळ ते दिसेनासे झाले. नेताच दिसेनासा झाल्याने चढाई करणाऱ्या मराठा घोडदळात काही काळ गोंधळ माजला. इतर मराठा सरदारांनी चढाई नेटाने रेटली. पण वाटेतील एका खोल नाल्यात अनेक घोडेस्वार पडले. हा नाला नेमका कोणता ते आज सांगणे अशक्य आहे. कदाचित आता तो बुजवलाही गेला असेल. इंग्रजी पलटणींनी या घोडदळ हल्ल्याला उत्तर म्हणून पायदळ चौकोन बनवून ते उभे राहिले. (अशा पायदळावर झालेला घोडदळाच्या हल्ल्यास प्रतिकार करण्यासाठी पायदळ चौकोनि आकार बनवून उभे राहते . बंदुकाना संगिनी लावून त्या बाहेच्या बाजूने रोखून धरल्या जातात. साहजिकच घोडे टोकदार संगिनी पाहून बिथरतात आणि मग पायदळाच्या रांगातील सैनिक बंदुकांच्या फैरीवर फैरी घोडेस्वारावर झाडतात). एलपीस्टन ने या हल्ल्या संबंधी लिहिताना म्हटले आहे की " I own I thought there was a good chance of our losing the
battle". बापू गोखल्यांनी दुसरा घोडा घेऊन चढाई चालू ठेवली.
मराठ्यांच्या तोफांचा प्रभाव कितपत झाला हे सांगणे कठीण आहे . पण इंग्रजी तोफानी मराठ्यांच्या मध्य बाजूची खूप हानी केली. इंग्रजी पायदळ फैरी मागून फैरी झडत मराठा फौजेच्या तोंडाशी येऊन ठेपले. इथपर्यंत संध्याकाळचे ७ वाजले होते. अंधार पडल्याने मराठा सैन्य माघार घेऊन पुण्याकडे परंतु लागले. आश्चर्य कारक रित्या इंग्रजी फौजांनी त्यांचा पाठलाग केला नाही. बहुदा नगरच्या फौजा येईपर्यंत थांबण्याचा त्यांनी विचार केला असावा. कॅ. फोर्ड आपले सैन्य घेऊन दापोडीस परत गेला तर कर्नल बरर हा खडकीच्या छावणीत परत गेला.
या लढाईत मराठ्यांचे ५०० सैनिक मारले गेले. शिवाय मोरो दीक्षित, सरदार कोकरे हे सेनानी सुद्धा पडले. हे सरदार कोकरे कोण आणि कसे पडले ते समजत नाही. अगदी ५०० सॆनॆक गमावले तरी अजूनही किमान २३-२४००० सैन्य शाबूत होते. इंग्रजांकडील ८६ लोक पडले. एकूण पाहता ही काही खूप हानी म्हणता येत नाही. खरे पाहता मराठ्यांनी चढाई चालू ठेवायला हवी होती. पण इंग्रजी सैन्याचे मनोधैर्य पाहूनच मराठे खच्ची झाले. पर्वतीवरून दुर्बिणीतून लढाई पाहणाऱ्या रावबाजीचे मन सुद्धा डळमळीत झाले असावे. पेशव्याच्या बखरीत "खावंदांचे मनात इंग्रज मोडायचा नाही " असे एक बोलके वाक्य आहे. त्याने बापूस लढाई थांबवण्याचा आदेश दिला. लढाई न थांबवता दुसरे दिवशी चालू ठेवली असती तर इंग्रज कितपत टिकले असते हे सांगणे कठीण आहे. पण लढाई मधेच सोडून देणे नक्कीच योग्य नव्हते. इंग्रजांनी या लढाईत निर्विवाद विजय जरी मिळवला नसला तरी त्यांनी मराठ्यांवर मानसिक विजय नक्कीच मिळवला.
खडकीची लढाई पाहून सर्वात जास्त निराशा जर कोणाची झाली असेल ती रावबाजीची. आपली २५-३० हजार फौज इंग्रजांच्या ३००० फौजेला नेस्तनाबूत करू शकत नाही हे पाहून तो नक्कीच निराश झाला असणार. कदाचित बापू गोखले यांच्या नेतृत्वाविषयीही तो नाराज असणार. शिंदे, होळकर, भोसले यांची कमतरता त्यास निश्चितच जाणवली असेल. म्हणूनच त्याचा पुढचा पळ होळकर, शिंदे, भोसले यांची मदत मिळवण्याच्या दृष्टीने सुरु झालेला दिसतो.
रावबाजीने पुढचे १० दिवस असेच वाया घालवले. पुढची लढाई येरवड्यात १५ नोव्हेंबरला झाली. या लढाईतही इंग्रजांची सरशी झाली. १७ नोव्हेंबर ला पुणे विना प्रतिकार इंग्रजांच्या हातात पडले. इतिहासात सैन्याच्या खांद्याला खांदा लावून नागरिकांनी शहरे किल्ले लढवल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. पण हे केव्हा शक्य होते? जेव्हा राज्यकर्ता वस्तूत: प्रजेचा पालनकर्ता असतो, त्याला स्वतःच्या प्रजेची काळजी असते तेव्हाच प्रजेस आपल्या राज्यकर्त्याविषयी आदर आणि प्रेम असते आणि मग ते त्याच्या साठी स्वतःचे रक्त सांडायास तयार होतात. रावबाजीचे राज्यारूढ झाल्यावरचे प्रजेशी वर्तन पहिले तर प्रजेस त्याच्या विषयी आदर , प्रेम असण्याचे काहीच कारण नव्हते. मग कोण कशाला त्याच्यासाठी लढेल?
अपयशाची करणे :-
१. रावबाजीचे द्विधा, डळमळीत आणि भिडस्त धोरण.
२. रावबाजीने सातारकर छत्रपती आणि इतर सरदारांशी केलेली पूर्वीची वर्तणूक.
३. रावबाजीची पुण्यातील जनतेशी सुरुवातीची वागणूक.
४. पेशवाईत स्थानिक लढवय्या समाजाकडे झालेले दुर्लक्ष्य.
५. २९ ऑक्टोबर ची गमावलेली संधी.
६. मराठ्यांचा नवीन युद्ध पद्धतीच्या अभ्यासाचा अभाव (पायदळ चौकोना विरुद्ध कसे लढायचे याचे अज्ञान)
७. पेशव्याच्या सैन्यातील शिस्तीचा अभाव.
८. पेशव्याच्या तोफखान्याचा आधुनिकतेचा अभाव.
९. पेशव्याच्या सैन्याच्या नैतिक मनोधैर्याचा अभाव.
१०. पेशव्याचा सैन्याच्या गुणवत्ते पेक्षा सैन्य संख्येवर भर.
११. जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा अभाव.
संदर्भ :- (कोणत्याही विशिष्ट क्रमाने नाही )
१. मराठी रियासत - सरदेसाई
२. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास -परांजपे
३. भूतावर भ्रमण -य. न. केळकर
४. सरदार बापू गोखले - आठवले
५. विंचूरकर घराण्याचा इतिहास - गाडगीळ
६. Battles of Honorable East India Company .-नरवणे
7. Bajirao And
The_East India_Company 1796-1818- गुप्ता प्रतुल
9. मराठे व इंग्रज -केळकर न. चिं .

Comments
Post a Comment